खामगाव (जि. बुलडाणा) : राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने फडकविले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज दुसऱ्या दिवशी रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत. त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पहावी लागते. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी खामगावचे नायब तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
हिंदू जनजागृती समितीच्या प्रीती नागपुरे, सचिन चांदुरकर (विश्व हिंदू परिषद), रवी माळवंदे (हिंदुराष्ट्र सेना), शिवा जाधव (युवा हिंदू प्रतिष्ठान), सागर बरेलवार, सोनू चव्हाण, राकेश सुतवणे, आनंद सिंग यावेळी उपस्थित होते. खामगाव शहरातील श्री लोकमान्य टिळक
माध्यमिक शाळा, केला हिंदी विद्यालय आणि नॅशनल विद्यालयात यावेळी जनजागृती कारण्यात आली.
शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन, विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करावी. शाळांतून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’, हा उपक्रम राबवण्यासाठी, तसेच समितीने या विषयावर जागृती करण्यासाठी बनवलेली विशेष ध्वनीचित्रफित विविध केबलवाहिन्या, चित्रपटगृहे यांत दाखवण्याविषयी अनुमतीपत्र मिळावे, ही मागणी यावेळी करण्यात आली.