अकोला : आजच्या युगात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. कठिण प्रसंगी याचा प्रतिकार करण्यासाठी प्रत्येक घरातील युवती तयार असावी यासाठी अकोल्यात ‘हर घर दुर्गा’ अभियान राबिवण्यात येत आहे.
कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी महिला व युवती तयार असाव्या म्हणून त्यांना शारीरिक व मानसिकदृष्टीने या मोहिमेतून सक्षम करण्यात येणार आहे. तज्ज्ञ प्रशिक्षक शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण युवती व महिलांना देणार आहे. ‘हर घर दुर्गा’ या मोहिमेअंतर्गत फक्त महिलांसाठी शिवकालीन युद्धकला प्रशिक्षणाचे आयोजन अकोला महानगरात प्रथमच करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणात लाठीकाठी, दांडपट्टा, भाला, ढाल- तलवार, बाणा, खंजीर लढतीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याप्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ २३ एप्रिल पासून होणार आहे. ७ मे पर्यंत हे शिबिर चालणार आहे. जुने शहरातील डाबकी रोडवर असलेल्या श्री राजराजेश्वर कॉन्व्हेंट, रेणुका नगर येथे हे शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर राबविण्यात येणार आहे. संपर्कासाठी व नाव नोंदणीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ७२१८८१७३०१ वर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.