अकोला : अकोला रेल्वे स्थानकावर धावत्या विदर्भ एक्स्प्रेसमध्ये प्लॅटफॉर्मवरुन एक व्यक्ती रेल्वेत चढत असताना तोल गेल्याने पडला. रेल्वेच्या दरवाजातून खाली कोसळल्यानंतर तो फरफटत जात होता. सुदैवाने गस्तीवर असलेल्या पोलिसाने लागलीच त्याला रेल्वे खालून वरती ओढले. त्यामुळे या व्यक्तीचा जीव वाचला.
सोमवार, २३ जानेवारी २०२३ रोजी रात्री साडेनऊ वाजता हा प्रकार घडला. प्लॅटफॉर्मवरुन क्रमांक दोनवरून पुढे जात असलेल्या रेल्वेत चढत असताना ३५ ते ४० वर्षीय व्यक्ती अचानक खाली पडला. त्यावेळी येथे ड्यूटीवर तैनात असलेले लोहमार्ग पोलिस विभागाचे कॉन्स्टेबल विलास पवार आणि नागरिक या व्यक्तीच्या मदतीसाठी धावले. या सर्वांनी मिळुन बोगी आणि रुळाच्या मध्ये फसलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. आतापर्यंत अशा पद्धतीने अकोला स्थानकावर तीन जणांचे प्राण वाचविले आहे.