Mumbai : महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी मंगळवारी (ता. 23) राज्यातील काही विद्यापीठांवर कुलगुरू नियुक्ती केली. राज्यपालांनी नागपूर येथील सीपी अँड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद अरविंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.
डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. विजय फुलारी हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे वरिष्ठ प्राध्यापक असून ते भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. डॉ. सुनील गंगाधर भिरूड यांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. भिरुड हे वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेत संगणक अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.
राज्यातील अनेक विद्यापीठातील कुलगुरूपद रिक्त होते. अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन झाल्यावर हे पद रिक्त होते. अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर प्रभारी कुलगुरू नियुक्त करण्यात आले होते. औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली होती. नियमित कुलगुरू असण्याबरोबरच राज्यातील चार विद्यापीठांचे प्रभारी कुलगुरूपद सांभाळण्याचा मान त्यांना मिळाला होता. डॉ. आंबेडकर विद्यापीठात 16 जुलै 2019 पासून नियमित कुलगुरू म्हणून ते कार्यरत होते.अमरावती परिसरातच त्यांचे शालेय शिक्षण झाले होते. बालपणही याच भागात गेले. जन्मभूमी असलेल्या अमरावतीच्या विद्यापीठात सेवेची संधी त्याना मिळाली होती.