मुंबई : अकोल्यातील झुरळ खुर्दचा मुद्दा आमदार अमोल मिटकरी यांनी लक्षवेधीतून उपस्थित केला. ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करीत त्यांनी दीशाभूल करणारी उत्तरे देऊ नका, असे आवाहन केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही जर गावांमध्ये मुलभूत सुविधा नसतील तर ही उदासीन परिस्थिती असल्याचे आमदार मिटकरी यांनी नमूद केले. धरणाच्या बॅकवॉटरमुळे ग्रामस्थांना अनेकदा पेरणी करावे लागते. झुरळ खुर्दमध्ये सरकारी दवाखाना, रस्ताही नाही, पथदिवे नाही, साधी आटा चक्कीही नाही, असे आमदार मिटकरी यांनी सरकारच्या लक्षात आणुन दिले. तातडीने एका दिवसात गावाच्या समस्येवर निर्णय घ्यावा तोवर सभागृहाचे कामकाज पुढे चालविण्यात येऊ नये असे ते म्हणाले. ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
महाजन यांच्या उत्तरानंतर झुरळ खुर्द ते झुरळ बुद्रुकपर्यंतचा रस्ताही पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी आमदार डॉ. रणजित पाटील यांनी केली. त्यावर ३० डिसेंबर २०२२ पर्यंत पूल व रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली. यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. रस्ता करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे मंत्री महाजन यांनी सभागृहात नमूद केले. दरम्यान चर्चेदरम्यान टीव्हीवर बातमी येईपर्यंत आमदार मिटकरी यांचे लक्ष जाऊ नये याबद्दल आश्चर्य वाटते अशी मिश्किल टिप्पणी मंत्री महाजन यांनी केली.
नावही बदलणार
झुरळ या गावाचे नावही बदलण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. त्यासाठी आपण प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्ताव मांडत असल्याचे आमदार मिटकरी म्हणाले. ग्रामस्थांनी ठराव घेतल्यास तशी मंजुरी देता येईल, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या. ग्रामस्थांना कोणते नाव हवे आहे, असे त्यांनी विचारल्यानंतर आमदार मिटकरी हासून म्हणाले, की ‘मंत्री गिरीश महाजन यांनी विकास केला तर गावाला गिरीशनगर देखील नाव देता येईल..’. मिटकरी यांच्या या उत्तरामुळे सभागृहात हंशा पिकला.