सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त नांदेडच्या एका भक्ताने विठ्ठल रुक्मिणीला सोन्याचा मुकुट चढविला आहे. या मुकुटांचे वजन अडीच किलो आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील भाविक विजयकुमार उत्तरवार यांनी हे मुकुट चढविले आहेत.
विजयकुमार उत्तरवार हे उमरी येथील सोने चांदीचे व्यापारी आहेत. यापूर्वी अनेक भाविक भक्तांकडून विठ्ठलाला मोठ्या प्रमाणावर विविध आभूषणे, अलंकार, दागिने अर्पण करण्यात आले आहेत. त्यात या दोन सुवर्ण मुकुटांची भर पडली आहे.
आषाढी वारीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून वारकरी व विठ्ठल भक्तांना शुभेच्छा पंतप्रधानांनी शुभेच्छा पाठवल्या आहेत. लाखो वारकरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पायी चालत पंढरपूर या संत नगरीमध्ये आले. आषाढी एकादशीला आलेल्या सर्वांना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.