Home » अकोल्यात जीएमसीच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे पाण्यासाठी आंदोलन

अकोल्यात जीएमसीच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे पाण्यासाठी आंदोलन

by नवस्वराज
0 comment

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना वसतिगृहात गेल्या सात दिवसांपासून पाणीटंचाई आहे. पाणी मिळत नसल्याने डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत ठिय्या आंदोलन करत निदर्शने केली.

अशोक वाटिका चौकातील उड्डाणपुलाखाली फुटलेल्या जलवाहिनीमुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातही पाणी नाही. महापालिकेकडून टँकरव्दारे जीएमसीमधील वसतिगृहांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र मागणीच्या तुलनेत हा पुरवठा कमी असल्याच्या तक्रारी वसतिगृहात राहणारे विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

पाण्याच्या मागणीसाठी यापूर्वी शनिवारी विद्यार्थी व प्रशिक्षणार्थ्यांनी इमारती समोर ठिय्या देत मागणी केली होती. सोमवारपर्यंत पाण्याचा प्रश्न निकाली लावावा अन्यथा पुन्हा जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला होता. त्याप्रमाणे सोमवारपर्यंत मागणीनुसार आवश्यक तेवढा पाणीपुरवठा वसतिगृहांना न झाल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन केले. ‘वुई वॉन्ट वॉटर’,’असे कसे देत नाही पाण्याशिवाय होत नाही’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी प्रशासकीय इमारत दणाणून सोडली. सात दिवसांपासून सकाळी टॉयलेट, बाथरूमला पाणी मिळत नाही. ब्रश करणे, आंघोळ करण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे  नाईलाजास्तव आंदोलन करावे लागले असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!