मुंबई : विविध प्रकारच्या आंदोलनांमुळे अनेकांचे चाहते बनलेल्या ‘आमदार बच्चूभाऊ’ यांचा दिवस त्यावेळी ‘कडू’ झाला, ज्यावेळी गिरगाव महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांचा जामिन नाकारत पोलिसांना कडू यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिलेत. अर्थात गिरगाव कोर्टाच्या या निर्णयाविरोधात आमदार कडू यांनी सत्र न्यायालयात अपिल दाखल केले आहे.
प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा, माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांना मुंबईच्या गिरगाव न्यायालयाने एका आंदोलन प्रकरणात दाखल गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कडू यांच्या विरोधार न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढला होता. त्यानंतर ते स्वत: न्यायालयात हजर झाले. मात्र कोर्टाने त्यांचा जामिन नाकारत पोलिसांना त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिलेत. गिरगाव कोर्टाने दिलेल्या आदेशांच्या विरोधात कडू यांनी अपिल दाखल केले. सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्या कोठडीबाबतचा (फैसला) फैसला होणार आहे.
प्रहार संघटनेच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात कडू यांनी अनेक आंदोलन केले. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते राज्यमंत्री झालेत. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही त्यांच्याकडे होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांचा गट महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आमदार कडू शिंदे यांच्यासोबत गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पहिल्याच टप्प्यात स्थान मिळेल असे मानले जात होते. परंतु तसे झाले नाही. आता गिरगाव न्यायालयाने त्यांचा जामिन फेटाळल्याने त्यांचे समर्थक व राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.