अकोला : अकोट आणि अकोल्याला जोडणाऱ्या गांधीग्राम जवळील पूर्णा नदीवरील क्षतीग्रस्त झालेल्या पुलाची दुरुस्ती करून वाहतूक कशी सुरू करता येईल याबाबत केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी दिल्ली येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम जवळील पूर्णा नदीवरील जुना पूल खचल्यामुळे त्यावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पूल तातडीने दुरुस्त व्हावा, यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू केला. पुलाच्या दुरुस्ती करीता त्यांनी विनंती केली. आमदार सावरकर यांच्या विनंतीची दखल घेत गडकरी यांनी दिल्ली येथे सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गांधीग्राम जवळील पूर्णा नदीवरील क्षतीग्रस्त पुलाचे सर्वेक्षण करून तो पूल दुरुस्त कसा करता येईल तसेच त्या पुलाला पर्यायी पूल कसा बांधता येईल याबाबत तातडीने अभ्यास करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्याचे आदेश दिलेत. या कामाचा अहवाल केंद्रीय वाहतूक मंत्रालयात सादर करण्यास सांगितले. बैठकीला गडकरी यांचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे महाव्यवस्थापक, प्रादेशिक अधिकारी आदी उपस्थित होते.