नवी दिल्ली : संपूर्ण जगाचे आणि विशेष करून भारतातील विरोधी पक्षांचे ज्याकडे लक्ष लागले होते, ते शक्तिशाली २० देशांचा सहभाग असलेले जी- २० शिखर संमेलन ९- १० सप्टेंबरला नवी दिल्ली येथे उत्साहात संपन्न झाले. संमेलनासाठी पाकिस्तान वगळता बांगलादेश, इजिप्त, माॅरिशस, नेदरलॅंड, नाइजिरीया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि संयुक्त अरब आमिरात यांना देखील विशेष आमंत्रण होते. संमेलनात आर्थिक, सामाजिक, पर्यावरण आदी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होऊन ठराव संमत करण्यात आले.
पाकिस्तानपासून वेगळा झालेला, आण्विक शस्त्र नसलेला बांगलादेश जी- २० संमेलनात सहभागी होता. परंतु शेजारी देश पाकिस्तानला आमंत्रण नव्हते. पाकिस्तानी नागरीकांनी सामाजिक माध्यमातून आपल्याच देशाच्या नेत्यांविरूद्ध संताप व्यक्त केला. भारत आणि पाकिस्तानच्या संबंधात काही कारणांमुळे कटूता निर्माण झाली आहे. पाकिस्तान नेहमी करत असले भारत विरोधी वक्तव्य तसेच वारंवार अतिरेकी कारवाया घडवण्याचा प्रयत्न, यात काहीवेळा पाकिस्तान यशस्वी देखील झाला आहे.
२००८ मधे मुंबई येथील तसेच पुलवामा व उरी येथील प्राणघातक अतिरेकी हल्ले याचे उदाहरण आहेत. भारतात संपन्न झालेल्या जी- २० शिखर संमेलनामुळे संपूर्ण जगात भारताची राजकीय प्रतिमा उंचावली असून, अन्य राष्ट्रांचा देशाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.