नागपूर : बेसा-घोगली मार्गावर तब्बल १८ विद्यार्थ्यांना कोंबून नेणारी भरधाव स्कूल व्हॅन उलटली. सोमवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी हा अपघात घडला. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी या व्हॅनमध्ये होते. व्हॅन शाळेची नसून खासगी व्यक्तीची असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले आहेत.
नियमानुसार १४ विद्यार्थ्यांची परवानगी असताना व्हॅनमध्ये १८ विद्यार्थी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागपुरात संताप व्यक्त होत आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अनियंत्रित व्हॅन रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यामध्ये उलटली. बेलतरोडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने अपघातस्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना इस्पितळात हलविण्यात आले. पोलिसांनी व्हॅनच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविल्याचे बेलतरोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत यादव यांनी सांगितले.
नागपूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अनेक स्वयंचलित वाहतूक सिग्नल्स बंद आहेत. चौकाचौकात दिसणारे पोलिस गायब झाले आहेत. एक राज्यपाल, एक केंद्रीय मंत्री, एक खासदार, एक उपमुख्यमंत्री, डझनभर माजी मंत्री, विधानसभा, विधानपरिषद आमदार असलेल्या नागपुरातील वाहतूक व्यवस्थेकडे मात्र कुणाचेही लक्ष नसल्याने शहरात घडणाऱ्या अपघातांची संख्या तर वाढली आहेच शिवाय नागपूर शहर ‘मोस्ट ट्रॅफिक जाम सिटी ऑफ विदर्भ’ म्हणून नावारुपास येत आहे. वाहतूक नियंत्रण शाखा आणि नागपूर पोलिस पुरेसे मनुष्यबळ नसल्याने आणि व्हीआयपींच्या बंदोबस्तात गुंतून असल्याने असा प्रकार होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.