जम्मू : पूर्वी अमरनाथ यात्रा अत्यंत अवघड होती. बाजूला खोल दऱ्या असलेल्या पर्वतीय रस्त्यावर अपघात घडून अनेक भाविकांनी प्राण गमावले आहेत. भाविकांचा हा त्रास लक्षात घेता केंद्र सरकारने अमरनाथ गुहेपर्यंत जाणाऱ्या पर्वतीय रस्त्याचे चौपदरीकरण केले आहे. भारतीय लष्कराच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला (बीआरओ) मागील वर्षी अमरनाथ गुहेतील मंदिरापर्यंत जाणाऱ्या दुहेरी मार्गाच्या देखभालीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याअंतर्गत प्रोजेक्ट बीकन मध्ये अमरनाथ यात्रा मार्गाच्या दुरूस्ती कामाचा समावेश होता. रस्त्याच्या चौपदरीकरणाची माहिती बीआरओने दिली. अमरनाथ गुहेपर्यंत गाड्यांचा ताफा पोचवला, भाविकांसाठी ही मोठी सुविधा उपलब्ध झाली.
या रस्त्याच्या बांधकामावर महबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाने टीका केली आहे. हिंदू धर्माविरोधात मोठा गुन्हा घडला असून हा रस्ता हिंदू धर्म आणि निसर्गावरील श्रद्धेबाबत अपराध आहे. पवित्र स्थळं हिमालयाच्या कुशीत आहेत. धार्मिक स्थळांचे रूपांतर पर्यटन स्थळात करणे निंदनीय आहे. त्यामुळे देवाचा कोप होऊन काश्मीरमध्ये विध्वंस ओढावून घेत आहोत, असे वक्तव्य पीडीपी पक्षाचे प्रवक्ता मोहित भान यांनी केले आहे.