नागपूर : महापारेषणच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकारणी सावनेरचे काँग्रेस आमदार व माजी मंत्री सुनिल केदार यांना नागपूर जिल्हा न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. कोराडी ते तिडंगीदरम्यान अतिउच्च दाबवाहिनीचे काम करणाऱ्या अभियंत्याला मारहाण केल्याचे हे प्रकरण आहे.
६ ऑक्टोबर २०१६ रोजी महापारेषणच्या वतीने कोराडी-तिडंगीदरम्यान अति उच्चदाब वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिन अधिग्रहणाचे कामही पूर्ण झाले होते. वीज वाहिनीसाठी येथे मोठे मनोरे उभारण्यात आले होते. महापारेषणचे सहाय्यक अभियंता अमोल खुबाळकर यांच्या उपस्थितीत पिकहानीच्या भरपाईसाठी यावेळी तेलगाव येथे वाटाघाटी सुरू होती. वीज वाहिनीचे काम करणाऱ्या मेसर्स बजाज कंपनीचे अधिकारीही येथे होते. त्यावेळी तत्कालीन आमदार सुनिल केदार शेतकऱ्यांसह तेथे पोहोचले.
काम सुरू करण्याची परवानगी कुणी दिली, असा प्रश्न उपस्थित करीत केदार आणि ईतरांनी खुबाळकर यांना आधी धमकावले व नंतर मारहाण केली. सावनेर पोलिस ठाण्यात याप्रकरणी केदार यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. साक्षी, पुरावे तपासल्यानंतर नागपूर न्यायालयाने केदार यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाची बाजू अॅड. अजय माहुरकर यांनी सांभाळली. जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे केदार यांचे वकिल अॅड. चंद्रशेखर जलतारे यांनी सांगितले.