अकोला : आलेगावातील एका प्रकरणानं खळबळ उडाली आहे. गावातील एका हिंदू दलित तरूणाच्या मुस्लिम धर्मात धर्मांतरणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या मुलाचं धमकावून धर्मांतर झाल्याचा आरोप त्याच्या आईनं केला आहे. दरम्यान, चान्नी पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर ॲट्रॉसिटीसह धमकावण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तरूणानं २१ नोव्हेंबर २०२२ रोजी इस्लाम कबूल केल्याचं शपथपत्रावर लिहिलं आहे. धर्मांतरणानंतर तो आपलं नाव आता ‘मोहम्मद अली’ असं सांगत आहे. शुभमचं धर्मांतरण बुलढाणा जिल्ह्यातील उंद्री गावातील मदरशात झाल्याचं त्याच्या आईनं म्हटलं आहे. आपल्या मुलाला गावातील अल्ताफ गादीवाले, अन्सार गादीवाले, शेख तन्वीर, शेख अजीम शेख मंजूर या चौघांनी दबाव आणि पैशाचं आमिष दाखवत धर्मांतरण घडवून आणल्याचा गंभीर आरोप मुलाच्या आईनं केला आहे.
धर्मांतरण करण्यात आलेल्या मुलाच्या आईनं अल्ताफ गादिवाले, अंसार गादिवाले, शेख तजवीर, शेख आजीम शेख मंजूर यांना मुलाच्या धर्मपरिवर्तनासंदर्भात जाब विचारला. त्यावर त्यांनी ‘तुम्ही टेंशन घेऊ नका’ असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर चारही आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर येत त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि अख्ख्या कुटुंबाचं धर्मांतरण करून टाका तुम्हाला चांगले पैसे देण्यात येतील, असं आमिषही दिलं, असा आरोप मुलाच्या आईने केला आहे. दरम्यान मुलाच्या आईच्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी चारही आरोपींविरूद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
प्रकरणाशी आंतरराष्ट्रीय तार जुळल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं केला आहे. या गावात पैशाचं, नोकरीचं आणि लग्नाचं आमिष दाखवत अनेक तरुणांचं धर्मांतरण केलं जात असल्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप बजरंग दलाचे विदर्भ प्रांत सहसंयोजक सुरज भगेवार यांनी केला.