Home » Ayodhya Ram Mandir : प्रथम कारसेवेचा अनुभव होता चित्तथरारक

Ayodhya Ram Mandir : प्रथम कारसेवेचा अनुभव होता चित्तथरारक

अरविंद लुकतुके यांच्या स्मृतींना उजाळा

by नवस्वराज
0 comment

Akola : श्रीराम जन्मभूमीसाठी भक्तांनी केलेली कारसेवा अभुतपूर्व अशीच होती. या कारसेवेच्या स्मृती आजही अनेकांच्या जीवनात कोरल्या गेल्या आहेत. अशाच स्मृती आहेत अरविंद लुकतुके यांच्या. लुकतुके आता हयात नसले तरी 1990 मध्ये श्रीराम जन्मभूमीसाठी झालेल्या कारसेवेतील त्यांचे चित्तथरारक अनुभव शब्दबद्ध केले आहे. राजेंद्र लुकतुके यांनी.

अरविंद लुकतुके यांनी 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या काळातील कारसेवेचा अनुभव कथन केला. त्यांनी सांगितले की, ग्वाल्हेर ते लखनौ रेल्वेने, लखनौ ते गोंडा बसने प्रवास केला. गोंड्याहून ते 60 ते 70 तरुण कारसेवकांनासोबत  पायी प्रवास करीत अयोध्येपर्यंत पोहोचले. सुमारे 50 किलोमीटरचा प्रवास या सर्वांनी पायी पूर्ण केला.

शरयू नदीच्या अलीकडे पोहोचल्यानंतर या ठिकाणी देशभरातून आलेले सुमारे 15 हजार कारसेवक होते. तिरावर जमलेले सगळे कारसेवक रात्री पायी निघाले व त्यांनी शरयू नदीचा पूल गाठला. पुलावर कारसेवकांना पोलिसांनी थांबविले. कारसेवा होणार असल्याने या भागात कडक संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवून ठेवले व संचारबंदी उठल्यावर पुढे जाण्याची सूचना केली.

कारसेवकांच्या अंगात श्रीरामनाम आणि जोश सळसळत होता. त्यामुळे ‘जयश्रीराम’च्या गर्जना करणे कारसेवकांनी सुरू केले. त्यामुळे शरयू नदीच्या पुलावर पोलिसांच्या लाठ्या कारसेवकांवर बरसल्या. अनेकांची माथी फुटली, पोलिसांनी अनेक कारसेवकांना पायदळी तुडवले. त्यामुळे कारसेवकही चिडले. कोणतेही कारण नसताना झालेल्या लाठीहल्ल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. त्यामुळे लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांनी अचानक बंदुकी ताणल्या. गोळीबार करण्यात आला. लाठीहल्ल्यात आपणही जखमी झाल्याचे अरविंद लुकतुके सांगतात.

लाठीहल्ला, अश्रूधुर आणि गोळीबारानंतर पोलिसांनी जो हाती सापडेल त्या कारसेवकाला वाहनांमध्ये कोंबणे सुरू केले. कारसेवकांच्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा सुरूच होत्या. अशात या गोंधळगर्दीतून एक साधु पुढे सरसावले. आपल्याला जखमी झाल्याचे पाहून त्यांनी पाणी दिले. पोलिसांच्या तावडीतूनही सोडविले, असे अरविंद यांनी नमूद केले.

प्रकरण थोडे शांत झाल्यावर अरविंद लुकतुके कारसेवकांच्या मोर्चात सहभागी झालेत. ज्या साधुने पिण्यासाठी पाणी दिले, त्याच साधुने दीडशे कारसेवकांना रामजन्मभूमीकडे नेले. जणूकाही साधूच्या वेशात रामच मदतीला धावून आले, असे सर्वांना वाटले. झपाटलेल्या रामभक्तांनी इतिहास घडवला. 6 डिसेंबरला अयोध्येतील वादग्रस्त ढाचा जमीनदोस्त करण्यात आला. यावेळी झालेल्या पोलिस कारवाईत अनेक कारसेवक बेपत्ता झालेत, अनेक जखमी झालेत. रामजन्मभूमीचे दर्शन आणि कारसेवेतील सहभाग यामुळे जीवन सार्थकी झाल्याचे अरविंद लुकतुके यांनी आपल्या अनुभवात सांगितले. लुकतुके आता कालवश झाले असले तरी त्यांच्या कारसेवेच्या स्मृती आजही त्यांचा परिवार व आप्तांमध्ये ताज्या आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!