अकोला : बाळ दत्तक घेण्याच्या किचकट आणि लांबलचक प्रक्रियेत बदल झाल्यानंतर अकोला येथे नव्या नियमांनुसार राज्यातील पहिला दत्तकविधान आदेश पारित करण्यात आला. अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी हा आदेश सुब्रमण्य यांना प्रदान केला. राज्याच्या महिला व बालविकास आयुक्त विमला आर. यांनी ‘नवस्वराज’ला ही माहिती दिली.
पूर्वीची दत्तकविधान प्रक्रिया कोर्टाच्या माध्यमातून व्हायची. त्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागायचा. सरकारने दत्तकविधान सोयीस्कर व्हावी म्हणून नियमात काही बदल केले. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार बहाल करण्यात आलेत. नियमात हे बदल झाल्यानंतरचा दत्तकविधानाचा पहिला ऑनलाईन अर्ज अकोल्यात दाखल झाला. अकोला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय आणि पुण्यातील महिला व बालविकास आयुक्त कार्यालयाने ही प्रक्रिया वेगाने पूर्ण केली. प्रक्रिया पूर्ण होताच गुरुवार, 6 ऑक्टोबर 2022 रोजी सुब्रमण्य यांना अकोल्याच्या जिल्हाधिकारी अरोरा यांनी दत्तकविधान आदेश बहाल केले. महिला व बालविकास आयुक्त विमला आर. यांनीही ट्विट करीत नियमात बदलांनंतरच्या राज्यातील ही पाहिली प्रक्रिया वेगाने पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी अरोरा, अकोल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजू लाडुकर आणि सुब्रमण्य यांचे अभिनंदन केले.