Political War : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांचा भारतीय जनता पार्टीत सुरू असलेला वाद आता विकोपाला जाताना दिसत आहे. नवनीत राणा यांना पक्षात घेतल्यानंतर बच्चू कडू भाजपवर चांगलेच नाराज झाले आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्यानंतर बच्चू कडू यांनी सोमवारी (ता. 8) अमरावतीत भाजपचा नेत्याविरुद्ध पोलिसात लेखी तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी भाजपचे प्रवीण तायडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
अचलपूर विधानसभा भाजप प्रमुख असलेले प्रवीण तायडे यांच्यावर पोलिसांत तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. अमरावती शहरातील राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत आमदार कडू यांनी सोमवार, 8 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण तायडे यांनी 4 एप्रिल रोजी खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झालेल्या जाहीर सभेत आपल्याविरुद्ध बदनामी व राजकीय प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कडू यांनी तक्रारीत केला आहे.
काय म्हणाले होते तायडे?
अमरावती मध्ये जाहीर सभेत बोलताना प्रवीण तायडे म्हणाले होते की, ‘आमदार कडू हे उमेदवार टाकायचे पैसे घेतात. न टाकायचेही पैसे घेतात. बच्चू कडू हा वसुलीबाज व नौटंकी आहे. हा आमदार सत्यानाश करायच्या मागे लागला आहे. नाव शेतकऱ्याचे घेतो, नाव शेतमजुराचे घेतो अशा अनेक गोष्टी आहेत. एक उद्योगधंदा अचलपुरात आणू शकला नाही. फिनले मिलबद्दल बोलतो. फिनले मिल विकत घेण्याचा डाव होता. तुमच्या जवळ एवढा पैसा कोठून येतो. तुम्ही दोन हजार कोटीचे मालक आहात.’
आपल्या भाषणात तायडे पुढे म्हणाले होते की, ‘तुम्ही वेगवेगळ्या धंद्याच्या माध्यमातून बांधकाम कंपनीच्या माध्यमातून पैसा गुंतविला आहे. लिजवर 35 एक्कर जागा घेतली ती एमआयडीसीकरिता देता आली असती. परंतु त्या जागेवर स्वत:चा फॉर्महाऊस बांधला. तेव्हा कुठे गेले शेतकरी प्रेम? आसेगाव सर्कल, कुर्हा सर्कलमध्ये पिकविम्याचे पैसे शेतकऱ्याला देवू शकले नाही. लाज वाटली पाहिजे.’ त्यामुळे आमदार कडू यांनी बदनामीकारक व खोटे वक्तव्य करून ते माध्यमाकडून प्रसिद्ध केल्यामुळे जनमानसात बदनामी झाल्याने भाजपचे प्रविण तायडे यांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.