आश्विन पाठक | Ashvin पाठक
Bhandara : शेतकऱ्यांकडून घेतलेले 6 हजार 564 क्विंटल धान मिलमालकांना न देता त्याची अफरातफर करून 1 कोटी 91 लाख रुपयांनी शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या मुंढरीत समोर आला आहे. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. करडी पोलिस ठाण्यात संस्थाध्यक्षांसह 13 संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
धानाच्या घोटाळ्यासाठी भंडारा जिल्हा काळ्या यादीत आला आहे. माँ शारदा सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित मुंढरीचे अध्यक्ष अभिजीत एकनाथ चौरागडे, संचालक विलास मारुती शेंडे, नितेश सरोज शेंडे, उमेश रवींद्र मेश्राम, नीलेश विठ्ठल आस्वले, श्रीकांत श्रीकृष्ण देव्हारे, पवन धनराज राऊत, राकेश धनराज गोमासे, आशिष पांडुरंग शहारे, हितेंद्र नेत्राम बारेवार, गजेंद्र एकनाथ चौरागडे व दोन महिला संचालकांचा घोटाळ्यात समावेश आहे.
खरीप व रब्बी हंगाम 2021-22 मध्ये या घोटाळेबाज संस्थेने परिसरातील शेतकऱ्यांकडून 25 हजार 482 क्विंटल धान खरेदी केले. त्यापैकी शासनाच्या डीओ ऑर्डरप्रमाणे 18 हजार 917 क्विंटल धान मिल मालकांना भरडाईसाठी देण्यात आले. मात्र उर्वरित 6 हजार 564. 46 क्विंटल धान देण्यात आले नाही. जिल्हा पणन विभागाद्वारे वेळोवेळी मागणी करूनही धान भरडाईसाठी देण्यात आले नाही.
धानाची अफरातफर करून तब्बल 1 कोटी 92 लाख 2 हजार 578 रुपयांचा अपहार करण्यात आला. यासंदर्भात जिल्हा पणन अधिकारी सुधीर संभाजी पाटील (वय 44) यांनी तक्रार दाखल केली. यासंदर्भात तपासाअंती संस्थाध्यक्षांसह संचालक मंडळांनी शासनाची करोडो रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे करडी पोलिसात याबाबत रीतसर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पी. बी. पाटील करीत आहेत.