Pune | पुणे : पुणे जिल्ह्यातील ओझर येथील विघ्नहर सभागृहात द्वितीय मंदिर न्यास परिषद संपन्न झाली. महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेला ज्ञानवापीचा खटला लढवणारे सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णू जैन, अधिवक्ता संदीप जायगुडे, सनातन संस्थेचे प्रवक्ता चेतन राजहंस, हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट प्रामुख्याने उपस्थित होते. विघ्नहर गणपती मंदिर देवस्थानतर्फे अधिवक्ता विष्णू जैन यांचा शाल, श्रीफळ आणि विघ्नहर गणेशाची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला. हिंदूंच्या मंदिरांवर नियंत्रण करण्याच्या षडयंत्राविरोधात आपला लढा सुरू असल्याचे अधिवक्ता विष्णू जैन यांनी सांगितले. ( Fight Against Conspiracy Of Control On Hindu Temple Continues Says Vishnu Jain at Pune)
ज्ञानवापी, काशी येथील न्यायालयीन लढा आणि यशाबाबत त्यांनी परिषदेत सविस्तर माहिती दिली. अधिवक्ता संदीप जायगुडे म्हणाले की, नेवासा येथील प्राचीन नारदमुनींच्या मंदिर परिसरात काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्याजागेवर दावाही केला आहे. पुराव्याआधारे आपण उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवल्याचे त्यांनी सांगितले.
सनातन धर्म रोगासारखा आहे, तो नष्ट होणे आवश्यक आहे, सनातन धर्माला संपवण्यासाठी जाणीवपूर्वक अशी वक्तव्ये काही लोक करतात. अशांचा विरोध संवैधानिक मार्गाने, त्यांचे विरोधात धार्मिक भावना दुखावल्या बाबत पोलिसांत तक्रार दाखल करून करावा असे विचार चेतन राजहंस यांनी व्यक्त केले. रमेश शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हलाल प्रमाणित वस्तूंबाबत उचललेल्या पावलांची माहिती दिली. अमेरिकेतील मंदिरातून हलालबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आपणही त्याप्रमाणे करावी असे शिंदे म्हणाले.
श्री विघ्नहर गणपती मंदिर देवस्थानच्या संकेतस्थळाचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले. मंदिर न्यास परिषदेसाठी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील मंदिर विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते असे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी कळवले आहे.