प्रसन्न जकाते
नागपूर/अकोला : उन्हाळ्याला सुरुवात झाल्यानंतर एप्रिल महिन्यांपासूनच तापमानत वाढ होते. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यात वैदर्भीय जनतेला उन्हाच्या चटक्यांऐवजी पाऊस आणि गारांचा मारा सहन करावा लागला आहे. त्यामुळे निम्मा एप्रिल महिना वाया गेला.
एप्रिल महिन्यातच विदर्भातील तापमान चाळीशीच्या आसपास येते. त्यामुळे उन्हाचे कडक चटके विदर्भातील सर्वच शहरांमध्ये जाणवायला लागतात. मात्र यावर्षी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या परस्परविरोधी वादळांमुळे अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. नागपूर येथील भारतीय मौसम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘नवस्वराज’ला दिलेल्या माहितीनुसार एप्रिलच्या ३० दिवसांपैकी सुमारे १५ दिवस विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीची नोंद करण्यात आली.
एका झटक्यात चाळीशीला पोहोचणारा पारा यंदा एप्रिल महिन्यात सरासरी किमान १९ अंश ते २४ अंश सेल्सिअसदरम्यान खेळत राहिला; तर कमाल तापमान मोजकेच काही दिवस ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहचू शकले. उर्वरित सर्व दिवस कमाल तापमानही २९ ते ३७ अंश सेल्सिअसदरम्यानच राहिले. पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतीमाल ओला झाला; तर वीज आणि ईतर पडझडीमुळे संपूर्ण महिनाभरात अनेकांना प्राण गमवावे लागले आहे.
संपूर्ण एप्रिल महिनाभर सकाळी गारवा, दुपारी ऊन आणि सायंकाळच्या सत्रात पाऊस असे वातावरण अनेकांनी यावर्षी अनुभवले. ताशी ४० किलोमीटर प्रतितास वेगाने आलेल्या वादळांमुळे विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी थैमान घातले. त्यामुळे वृक्ष उन्मळुन पडणे, वीज, दूरध्वनी, इंटरनेट पुरवठा खंडीत होणे. वाहतूक प्रभावित होणे अशा अनेक गैरसोयींना नागरिकांना तोंड द्यावे लागले. एप्रिलनंतर आता मे महिन्याला सुरुवात झाली आहे. तरीही पाहिजे त्या प्रमाणात उन्हाळा तापलेलाच नाही. राजस्थानमधील उष्ण वादळ अद्यापही सक्रिय झालेले नाही. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वादळी थैमान कायम आहे. त्यामुळे १२ मे पर्यंत वादळी पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी यंदा उन्हाळ्याला पावसामुळे सुट्टी मिळते की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.