बुलढाणा : शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा मुद्दा सध्या चांगला स्थापला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी याविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे. पिक विमा संदर्भात आक्रमक भूमिका घेत तुपकर विमा कंपनीच्या कॉर्डिनेटरसह पोलिस ठाण्यात दाखल झाले.
जिल्ह्यातील सव्वालाख शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी लुटल्याचा आरोप केला जात आहे. तसेच पीक विमा कंपन्यांनी मोठा घोळ केल्याचा दावा केला जात आह . भरलेला पीक विमा आणि मिळालेला पीक विमा यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे शेतकरीनेते रविकांत तुपकर प्रचंड आक्रमक झाले आहेत. विमा कंपनीच्या जिल्हा कॉर्डिनेटरला रविकांत तुपकरांनी डांबून ठेवले होते. शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका तुपकरांनी घेतली होती. दरम्यान विमा कंपनीकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने तुपकरांसह शेतकऱ्यांनी विमा कंपनीचा जिल्हा कॉर्डिनेटर दिलीप लहाने याला वाहनात कोंबून बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात नेले. तिथे त्याच्यासह जिल्ह्यातील १३ तालुका कॉर्डिनेटर विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. विमा कंपनीचा जिल्हा कॉर्डिनेटर दिलीप लहाने याच्यासह, राज्याच्या प्रमुख शंकुतला शेट्टी, दीपक पाटील यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तुपकरांनी लावून धरली.