अकोला : वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होते. यावर नियंत्रण मिळवणे शासनासाठी मोठे आव्हान आहे. वायुप्रदूषणावर आळा बसावा म्हणून म्हणून शासन इलेक्ट्रीक वाहनांच्या पुरस्कार करते आहे. अकोला महानगरात २००३ मध्ये शहर बस वाहतूक सुरू केली होती. त्यावर अकोला महानगरपालिकेचे नियंत्रण होते. २०१० मध्ये ही सेवा बंद पडली. त्यानंतर २०१७ मध्ये श्रीकृपा ट्रॅव्हल्स कंपनीला शहर बस वाहतुकीचे कंत्राट देण्यात आले. त्यांनी महानगरातील विविध मार्गावर २० बसेस सुरू केल्या. परंतु २०२० मध्ये पुन्हा काही कारणामुळे बससेवा बंद पडली.
ऑटोरिक्षा चालकांच्या मनमानीमुळे अकोलेकरांना आर्थिक भुर्दंड आणि अन्य समस्यांचा सामना करावा लागतो. राज्यातील काही शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रीक बसेस चालवण्याचा लोकहितार्थ निर्णय केंद्र तसेच राज्य शासनाने घेतला आहे. याअंतर्गत अकोला महानगरासाठी ५० ई-बस मंजूर करण्यात आल्या आहेत. बसेसच्या देखभालीचा खर्च महानगरपालिका प्रशासनाला करावा लागेल.
राज्य सरकारच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने ई-बसेस मंजूर केल्यानंतर चार्जिंगची व्यवस्था उभारली जाणार आहे. या प्रीत्यर्थ केंद्र सरकारतर्फे जवळपास १० कोटी रूपये अनुदान प्राप्त होईल. दिवाळीच्या तोंडावर अकोलेकरांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.