नवी दिल्ली : पूर्वेकडील राज्य नागालॅंड, मेघालय आणि त्रिपुरा या तीनही राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ मार्चमध्ये संपत आहे. मुदत संपत असलेल्या एकुण नऊ राज्यांपैकी तीन राज्यांच्या निवडणुकीची घोषणा बुधवार, १८ जानेवारी २०२३ रोजी जाहीर करण्यात आली.
निवडणूक जाहीर झालेल्या तीनही राज्यात अडीच लाख नवमतदार आहेत. त्रिपुरात १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मेघालय आणि नागालॅंड येथे २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या तीनही राज्यांच्या निवडणुकीची घोषणा केली. प्रत्येकी ६० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली.
निवडणूक आयोगाच्या कर्मचारी दुर्गम भागात कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवितात, याबाबतचा माहितीपट यावेळी दाखवण्यात आला. निवडणूक आयोगाच्या ३७६ महिला कर्मचाऱ्यांचा या मतदान प्रक्रियेत समावेश राहणार आहे. निवडणुकीची आचार संहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने तीनही राज्यांमध्ये तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. केंद्रीय सुरक्षा दलांचीही मदत यावेळी घेण्यात येणार आहे.