मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दोन वेळा फोन करून त्यांच्याशी या सर्व घडामोडींवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून भाजप सोबत सत्ता स्थापन करतात की काय, अशी शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
शिवसेनेला संपविण्यासाठी आणि पक्षाला महाराष्ट्रात पर्याय निर्माण करण्यासाठी भाजप बराच प्रयत्न करीत आहे. अशांत शिंदे गट मनसेत गेल्यास भाजपचा हेतू साध्य होईल. इतकेच नव्हे तर राज ठाकरे यांची संतापलेल्या शिवसैनिकांना शांत करण्याशिवाय क्षमता असल्याने त्याचा फायदाही शिंदे गटाला होईल.
एकनाथ शिंदे यांनी काल शिवतीर्थावर फोन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर चर्चा केल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांनी राज यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. राज ठाकरे व शिंदे यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. हिपबोनच्या शस्त्रक्रियेनंतर सध्या राज यांना विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज यांनी अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. ते काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.