Buldhana : जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रूक येथे सासूने जावयाला केलेल्या मारहाणीत जावयाचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. लेकीचा नवरा दारुडा असल्यामुळे आई मुलीला माहेरी परत घेऊन आली. परंतु दारूडा जावई तिथे येऊन त्यांना त्रास देत होता. 23 फेब्रुवारी शुक्रवारी संध्याकाळी जावई दारू पिऊन सासूरवाडीला आला. सासूच्या घरासमोर शिवीगाळ करून, त्याने घराच्या बंद दारावर विटा आणि दगड फेकणे सुरू केले. समजावूनही जावई ऐकत नसल्यामुळे, सासूचा पारा चढला, तिने जावयाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याला बॅटने बेदम मारहाण केली. मारहाणीत जावयाचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सासू सुशीला काळे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दीपक गजानन हाडोळे (रा.शेगांव) असे मृतक जावयाचे नाव आहे. दीपकची पत्नी वैष्णवी (वय 30) हिने घटनेची माहिती शेगांव ग्रामीण पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीसांनी शुक्रवारी रात्री कारवाई करून आरोपी सुशीला काळे हिला ताब्यात घेतले. तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आईच्या आधारे कसेतरी जीवन जगणारी वैष्णवी आता आईमुळेच निराधार झाली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.