Ratnagir | रत्नागिरी : मंदिरात दर्शनाला येताना काही भाविक उत्तेजक, अंगप्रदर्शन करणारे तोकडे कपडे घालून येतात. भारतीय संस्कृती आणि मंदिराचे पावित्र्य या दृष्टीकोनातून हे योग्य नाही. महाराष्ट्र शासनाने 2020 मध्ये शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. पोलिस, लष्कर, नीमलष्करी दल, शाळा, महाविद्यालये यात पूर्वीपासून गणवेष लागू आहे. देशातील अनेक मंदिर, गुरुद्वारे, चर्च तसेच अन्य प्रार्थनास्थळात देखील वस्त्रसंहिता आहे.
मंदिराचे पावित्र्य, संस्कृती व शिष्टाचाराराची जपणूक व्हावी म्हणून ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ तर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी मंदिर व्यवस्थापकांच्या बैठकी घेऊन जिल्ह्यातील 50 मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Dress Code Applicable To 50 Temples In Ratnagiri District)
राजापूर तालुक्यातील कशेळी येथील कनकादित्य मंदिर, अडिवरेचे महाकाली मंदिर, राजापुरातील विठ्ठल राम पंचायतन मंदिर, रत्नागिरी मधील स्वयंभू काशिविश्वेश्वर देवस्थानाचा यात समावेश आहे. भाविकांनी अंगप्रदर्शन करणारे, अशोभनीय,उत्तेजक, तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी असेल. रत्नागिरी जिल्ह्यातील 20 मंदिराच्या दर्शनी भागात तसे फलक लावण्यात येणार आहेत. गणपतीपुळे मंदिर व्यवस्थापन समितीशी देखील या बाबत बोलणे झाले आहे, असे महाराष्ट्र मंदिर महासंघाने प्रसिद्धीपत्रका द्वारा जाहीर केले आहे.