मुंबई : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सामूहिक बलात्काराचे प्रकरण गंभीर आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान हा मुद्दा विधान परिषदेत गाजला.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणावर विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा केली. आमदार अभिजित वंजारी, अमोल मिटकरी, उमा खापरे, महादेव जानकर यांनी या चर्चेत सहभाग घेतला. चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदिया-भंडारा पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. आरोपींचा शोध सुरुच आहे. पीडित महिलेला सायकोसिसचा त्रास असल्याने तपासात थोडी अडचण येत आहे, परंतु त्याचा फायदा आरोपींना होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. पीडित महिलेचे समुपदेशन करून आरोपींचा शोध लागेपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही. महिलांविषयक अत्याचाराच्या सर्व एसओपी पाळल्या जाव्या, यासाठी पोलिस व वैद्यकीय यंत्रणांना पुन्हा प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सरकारला बलात्कार व पोक्सो पीडितांना मदतीचे आदेश दिले. पीडितांना तत्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याबाबत उदासीन असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. पीडितांना साक्षी, पुराव्यांसाठी बोलावण्यात येते त्यावेळी त्यांना बरेचदा उपाशी रहावे लागते. कधीकधी पोलिस आपल्याजवळचे पैसे खर्च करतात. त्यामुळे सरकारने अशा प्रकरणांसाठी निधी देण्याची सूचना त्यांनी केली.