Home » Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचे उत्तर

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचे उत्तर

Manoj Jarange Patil : विधान सभेत आमदार आशिष शेलार आक्रमक

by नवस्वराज
0 comment

Mumbai : अंतरवली सराटीमधील पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडवीसांवर गंभीर आरोप केले. याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे स्वरूप बदलून देवेंद्र फडणवीसांच्या मुंबई येथील सागर निवासस्थानी जाण्याऐवजी हे आंदोलन बेमुदत उपोषण साखळी उपोषणात रुपांतरीत करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी वैद्यकीय उपचारही घेतले. यासंदर्भात विधानसभेमध्ये मोठा गदारोळ झाला. आमदार आशिष शेलार यांनी जरांगेंचे आंदोलन आणि त्यांच्या आरोपांची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी केली. त्यानुसार चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही आपली भूमिका सभागृहासमोर स्पष्टपणे मांडली.

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन व त्यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांमागे कोण आहे? असा प्रश्न उपस्थित करून आमदार आशिष शेलार यांनी सभागृहात अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले. यासंदर्भात आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्यावर देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत त्यांची भूमिका विस्ताराने विषद केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्याला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. या विषयावर बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती. परंतु विषय निघाल्यामुळे काही गोष्टी सभागृहाला सांगणे आवश्यक आहे. सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजासाठी आपण काय केले हे माहिती आहे. आपण मराठा समाजाला आरक्षण दिले. ते उच्च तसे सर्वोच्च न्यायालयात टिकवले. सारथीसारखी संस्था सुरू करणे, विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देणे अशा योजना आपण सरकारच्यावतीने सुरू केल्या. त्यामुळे मला कुणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

मराठा समाजाला माहिती आहे आपण काय केले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे काही बोलले, त्यानंतर मराठा समाज त्यांच्या नाही तर आपल्यामागे उभा राहिला आहे. दु:ख एकाच गोष्टीचे वाटते की, अशाप्रकारे कुणीही कुणाची आई-बहीण काढेल. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत पाठवणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. पण त्यांचे नाव घ्यायचे आणि लोकांच्या आयाबहिणी काढायच्या? पण आपली कोणाविषयी कुठलीही तक्रार नाही. परंतु यामागे कोण आहे हे शोधावेच लागेल, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी अंतरवली सराटीमध्ये पहिल्यांदा झालेल्या लाठीचार्जवर भाष्य केले. त्यावर फडणवीसांनी माहिती दिली की, दगडफेक करणारे सांगत आहेत की, त्यांना दगडफेक करायला कुणी सांगितले. पोलिसांनी लाठीचार्ज केला ते महत्त्वाचे आहेच. पण तो का झाला? आता सर्व षडयंत्र बाहेर येत आहे. रात्री जाऊन मनोज जरांगेंना परत आणणारे कोण आहेत? त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत? बैठक कुणाकडे झाली, ते आरोपीच सांगत आहेत. दगडफेक करा असे सांगितल्याचे देखील आरोपीच सांगत आहेत. पोलिस आपले नाहीत का? असा प्रश्नही फडणवीसांनी उपस्थित केले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आपण बीडची घटना विसरत आहोत. हे आंदोलन शांततेने झालेले नाही. मराठा समाजाने काढलेले मोर्चे शांततेतच झाले. पण यावेळी शांतता नव्हती. आपले राजकारण कुठल्या स्तराला चालले आहे? कोण त्यांच्या सोबत होते? त्यांचे फोटो कुणासोबत निघत आहेत? हे सगळे बाहेर येत आहे. अशाप्रकारे कुणी कुणीची आई-बहीण काढणार असेल, तर या सभागृहाकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी संबंधित सदस्याच्या पाठिशी उभे राहायला हवे. मग ते सत्ताधारी पक्षाचे असो किंवा विरोधी पक्षाचे असो. विरोधकांच्या बाबतीत असे काही घडले तर हा देवेंद्र फडणवीस त्यांच्यामागे ताकदीने उभा राहील.

यासंदर्भात एसआयटी चौकशी होईल. पण आपल्याला मनोज जरांगे पाटलांशी काहीही देणेघेणे नाही. त्यांचा बोलवता धनी कोण आहे ते समोर आले पाहिजे. काही लोक रोज जे बोलतात. तेच ते बोलतात. ‘वॉररूम’ कुणी आणि कुठे उघडली याची माहिती आमच्याकडे आहे. चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढले जाईल असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!