नागपूर : ‘न्यायालयाने माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांना फक्त जामीन मंजूर केला आहे. कोर्टात खटला अद्यापही सुरू आहे. त्यामुळे जामिनावर सुटलेल्या व्यक्तीने अतिरेकी वक्तव्य करू नये’, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी दिली. नागपुरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
देशमुख यांच्या विरोधात अनेक पुरावे आहेत. त्यामुळेच ते अनेक दिवस कोठडीत होते. कोणताही पुरावा नसता तर त्यांना सुरुवातीपासून कोर्टाने कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेच नसते. त्यामुळे अनिल देशमुख यांनी बोलताना भान ठेवावे, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला.
बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व टिकवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. उद्धव ठाकरे यांनी मात्र हिंदुत्व सोडून पाठीत खंजीर खुपसला. मात्र त्यांना चूक लक्षात आली आहे. माझी चूक झाली, असे वाटणे हे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे. पण आता त्यांना बोलता येत नाही, अशी परिस्थिती आहे. युती तोडून काँग्रेसची विचारधारा स्वीकारली, अशी टीका यावेळी बावनकुळे यांनी केली.