अकोला : उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व महाउर्जा कंपनीची आढावा बैठक घेतली. राज्याचे प्रधान सचिव ( उर्जा ) कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक तसेच संचालक या बैठकीला उपस्थित होते.
महावितरणने आवश्यकतेनुसार प्रथम शहरी भागात स्मार्ट मीटर बसवावेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसविण्यात यावेत. मीटर नामंकित कंपनीचे, दर्जेदार असावते अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या. ग्राहकांना योग्य देयके मिळावी या दृष्टिकोनातून फोटो मीटर रिडींगचे फोटो मानवी हस्तक्षेप टाळून थेट सर्व्हर प्रणालीत येण्यासाठी प्रयत्न करावे. महावितरणने ईतर कंपन्यांची थकबाकी देण्यासाठी केंद्र शासनाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा असे ते म्हणाले.
केंद्र शासनाने देशातील महावितरण कंपन्यांच्या जाहीर केलेल्या क्रमवारीत आपण कमी पडलो आहोत, त्यात सुधारणा व्हावी असे आवाहन त्यांनी केले. सौरऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या गुंतवणुकदारांसोबत प्राधान्याने चर्चा करावी, असे अधिकाऱ्यांना सांगितले. महानिर्मिती कंपनीने टप्प्याटप्प्याने जुने सबक्रिटीकल संच बंद करून अत्याधुनिक पर्यावरणपूरक सुपर सबक्रिटीकल संच गरजेनुसार, गतिमानतेने उभारावेत अशा सूचना फडणवीस यांनी महानिर्मिती अधिकाऱ्यांना दिल्या. दर्जेदार कोळशाचा पुरवठा होईल, यासाठी पाठपुरावा करून वीजकेंद्रांच्या कामगिरीत सुधारणा करावी, पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. चंद्रपूर येथील इरई धरणातील प्रस्तावित तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या धर्तीवर मराठवाड्यातील जायकवाडी धरणात हा प्रयोग करणे शक्य आहे का, याची चाचपणी करावी असे ते म्हणाले. जुन्या बंद पडलेल्या संचांच्या जागेचा विधायक उपयोग करून त्या माध्यमातून मालमत्ता चलनीकरणाच्या प्रक्रियेतून महानिर्मिती कंपनीने वाढीव उत्पन्नाचा स्रोत शोधण्यावर फडणवीस यांनी जोर दिला.