Mumbai : महावितरण कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची 19 वर्षाची परदेशात शिकणारी मुलगी मुंबईच्या ताडदेव भागातून बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली. ‘हायप्रोफाइल’ प्रकरण असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क होऊन मुलीची शोधाशोध सुरू झाली.
प्राप्त माहितीनुसार पोलिस ठिकाणावर पोहोचण्याआधीच ती पसार व्हायची. त्यामुळे पोलिसदेखील दबावात होते. परंतु 25 दिवसांच्या शोधमोहिमेनंतर पोलिसांना तरूणी तिच्या ‘ड्रायव्हर’ प्रियकरासोबत सापडली. दक्षिण मुंबईतील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या महावितरण कंपनीमधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची 19 वर्षाची मुलगी परदेशात शिकत होती. डिसेंबर 2023 मध्ये ती नाताळच्या सुट्टीत भारतात आली. सुट्टी संपल्यामुळे 13 जानेवारी 2024 रोजी ती परत जाणार होती. तिला विमानतळावर सोडण्यासाठी जाताना वडिलांनी ताडदेव येथे औषधी खरेदीसाठी गाडी थांबवली.
वडील उतरल्यावर पाठोपाठ मुलगीही काही वस्तू विकत घेण्याचे कारण सांगून गाडीतून उतरली आणि टॅक्सीत बसून निघून गेली. परत आल्यावर मुलगी न दिसल्यामुळे, ड्रायव्हरला विचारले असता त्याने वडिलांना माहिती दिली. बराच वेळ प्रयत्न करूनही मुलीचा मोबाइल बंद येत असल्यामुळे अखेर अधिकारी वडिलांनी ताडदेव पोलिस ठाण्यात धाव घेतली. मुलीला पळवून नेल्याची तक्रार त्यांनी दिली. पोलिसांनी बेपत्ता मुलीचा तपास सुरू केला.
मुलीच्या वडिलांनी एका व्यक्तीवर संशय व्यक्त केल्याने त्या अनुषंगाने तपासाची चक्र फिरू लागली. मुलगी सारखी स्थान बदलत असल्यामुळे पोलिस जेरीस आले होते. बेपत्ता मुलगी आणि संशयित व्यक्तीचे फोन कॉलचे तपशील तपासण्यात आलेत. त्यावेळी उत्तर प्रदेशातील एका क्रमांकावर सर्वाधिक कॉल्स करण्यात आल्याचे निदर्शनास आले. हा क्रमांक संशयिताच्या भावाचा असल्याचे कळताच पोलिस पथकाने उत्तर प्रदेशातून संशयिताच्या भावाला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याच्या जवळून 9.50 लाख रोख, सोनेचांदी व हिऱ्याचे दागिने, घड्याळ, दोन मोबाइल जप्त केले. सखोल चौकशीनंतर बेपत्ता मुलीने हा ऐवज तिच्या प्रियकराला म्हणजे आपल्या भावाला दिल्याचे त्याने सांगितले. भावाने नंतर आपल्याला हे साहित्य ठेवण्यासाठी दिल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.
संशयिताच्या भावाला ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी मुलगी व तिच्या प्रियकराचा कसून शोध सुरू केला. परंतु स्थान बदलून ते पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर 25 दिवसानंतर माहितीच्या आधारे पोलिसांनी बेपत्ता मुलगी आणि तिच्या ड्रायव्हर असलेल्या प्रियकराला कळवा (पूर्व) येथील झोपडपट्टीतील खोलीतून ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणल्यावर प्रेमीयुगुलाने लग्न केल्याचे सांगितले. चौकशीदरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मुलीचा ड्रायव्हर पती हा पूर्वीच विवाहित असून त्याची प्रथम पत्नी उत्तर प्रदेशात राहते.