अकोला : कुलरमध्ये विद्धुत शॉक लागल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना महान येथे ३० जुलै रोजी दुपारी घडली आहे. स्थानिक महान येथील रहिवासी प्रभाकर बाप्पुराव जनोरकार (७० वर्ष) व त्यांची पत्नी निर्मला प्रभाकर जानोरकार (६५ वर्ष) हे पाटील पुऱ्यात रहात होते. ३० जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता प्रभाकर जानोरकार हे शेतातून काम करून घरी परतले असता त्यांना घराचे दार आतून लावलेले दिसले.
खिडकीतून डोकावून पाहले असता त्यांची पत्नी कुलरच्या पाठीमागे खाली पडलेली त्यांना दिसली. त्यांच्या पत्नीला चक्करचा आजार असल्याने तिला चक्कर आल्यामुळे ती खाली पडली असावी, असा विचार त्यांच्या मनात आल्याने त्यांनी उदय जानोरकार आणि आशिष पोफळे यांच्या मदतीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा तुटत नसल्याने त्यांनी घरामागील दरवाज्यामधून आत प्रवेश केला. पत्नीला उचलण्यासाठी ते कुलरच्या समोरून जात असताना त्यांच्या हाताचा स्पर्श कुलरला झाल्याने ते सुद्धा कुलरला चिटकले आणि जोराने ओरडा केला.
खिडकीतून पाहत असलेले आशिष पोफले आणि उदय जानोरकार यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी घराबाहेरील मिटरवर काठ्या मारल्या परंतु, वीजप्रवाह खंडित झाला नाही. शेवटी सर्व्हिसलाइनवर काठ्या मारल्यावर वीजप्रवाह बंद झाला. त्यानंतर प्रभाकर जानोरकार हे कुलरच्या पाण्याच्या टपाकडे फेकल्या गेले. उपस्थित नागरिकांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता तोपर्यंत ते दोघेही ठार झाले होते. मृतक निर्मला जानोरकार यांच्या उजव्या हाताला शॉक लागल्यासारखा जळलेले दिसले. त्यांना दुपारच्या वेळेस शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या शरीरावरून दिसून येत असल्याचे बोलल्या जात आहे. मृतकाचे पती प्रभाकर जानोरकार यांच्याकडे दोन एकर शेत असून, त्यांना एकही अपत्य नाही.