अमरावती : प्रदेश काँग्रेसची आढावा बैठक अमरावतीमध्ये पार पडली. या बैठकीत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात काँग्रेसच्या कामाचा प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आढावा घेतला. आमदार अॅड. यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री डॉ. सुनिल देशमुख, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे, आमदार बळवंत वानखेडे, जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख, शहर अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, अमरावतीचे प्रभारी नाना गावंडे आदी बैठकीला उपस्थित होते.
बैठकीनंतर पटोले म्हणाले की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक आहेत, शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरतेला लुटले होते, पण आजचे सत्ताधारी महाराष्ट्र लुटून सुरतेला देत आहेत. सरकार मधले लोक गुजरातचे हस्तक आहेत हे त्यांनीच जाहीरपणे सांगितलेले आहे. काँग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास वाढत असून जनतेपर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवणे याला प्राधान्य दिले जाणार आहे.
उदयपूर शिबिरातील निर्णयांची अंमलबजावणी कितीपत झाली याचाही आढावा घेतला जात आहे. जागा वाटपाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीमध्ये चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे. स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या पक्षाने जागा लढवावी अशी मागणी करत असतात ते योग्यच आहे, पण गुणवत्तेच्या आधारावर जागा वाटपाचा निर्णय घेतला जाणार आहे. कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ मिळेल यापेक्षा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणायचे आहे. लोकशाही व्यवस्था मान्य नसलेल्या भाजपाला सत्तेबाहेर काढणे हेच आमचे काम आहे, असे पटोले म्हणाले.
नाशिकमधील अंमली पदार्थांचे लोण अमरावती सारख्या शहरातही पसरत आहे. शाळा, महाविद्यालयांमधील मुलांना अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढले जात आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. नाशिक मधील प्रकरणाची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे. तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा हा प्रकार थांबवणे गरजेचे आहे. सरकारने महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करु नये. राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाशिवाय अंमली पदार्थांची तस्करी अशक्य आहे, असा आरोप पटोले यांनी केला.