Home » शिंदेंकडुन हुतात्म्यांना अभिवादन; फडणवीसांकडुन नागपुरात ध्वजारोहण

शिंदेंकडुन हुतात्म्यांना अभिवादन; फडणवीसांकडुन नागपुरात ध्वजारोहण

by नवस्वराज
0 comment

मुंबई/नागपूर : महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजधानी मुंबईत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपराजधानी नागपुरात ध्वजारोहण केले. महाराष्ट्र दिनाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले. यानंतर हुतात्मा चौक येथे उपस्थित राहून महाराष्ट्राच्या स्थापनेकरता बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण केले. नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ महिन्यांत राज्याच्या विकासासाठी सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले.

नागपूर येथे ध्वजारोहणानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर सर्व देशाला हेवा वाटावा, अशी प्रगती महाराष्ट्राने केली आहे. राज्यात नऊ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेले सरकारने राज्याच्या विकासासाठी नऊ महिने प्रयत्न केले आहेत. यापुढे राज्याचा गतिमान विकास करण्याचे आमचे धोरण आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आतापर्यंत कोणत्याही सरकारने दिली नाही एवढी ऐतिहासिक मदत आम्ही शेतकऱ्यांना केली आहे. शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात ही मदत पोहोचवली जात आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल तसेच वंचित घटकांसाठी आम्ही राज्यात १० लाख घरांची निर्मिती करणार आहोत. गोरगरीबांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यात आतापर्यंत ३०० ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील प्रत्येक नागरिकाला जाता येईल अशा मोठ्या संख्येने हे दवाखाने सुरू केले जातील.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!