नागपूर : समृद्धी महामार्गासाठी नागपुरात पोहोचलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःला भाग्यवान म्हटले. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या समृद्धी महामार्गासाठी एमएसआरडीसी मंत्री म्हणून काम करण्याचा बहुमान मिळाला होता.
तेव्हा मंत्री झाल्यामुळे काम करण्याची आणि आता लोकार्पण करण्याची संधी मिळाली आपले आणि फडणवीसांचे दोघांचेही भाग्य आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्या विकासाला गती मिळेल. या महामार्गाने नागपूर व मुंबई दोन्ही शहरे जोडली जाणार असून या महामार्गामुळे उद्योगांना गती मिळणार आहे.
शेतकऱ्यांना या महामार्गाचा फायदा होणार आहे. पूर्वी 16 ते 18 तासांचा प्रवास आता 6 ते 7 तासांवर नेण्यात येणार आहे. याआधीही आपण गाडी चालविली आहे. लोकार्पणानंतर समृद्धी महामार्गावर आपण स्वत: वाहन चालविणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या 700 किलोमीटरच्या महामार्गापैकी 520 किलोमीटरचा महामार्ग शिर्डीपर्यंत खुला करण्यात येत आहे.