प्रसन्न जकाते
नागपूर : विदर्भासह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ऊन, वारा, पाऊस आणि गारपीट असा खेळ सुरू आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाली आहेत. भारताच्या आजूबाजूला असलेले दोन्हीही समुद्र गेल्या काही दिवसांपासून खवळल्यामुळे हा प्रकार घडत आहे.
भारतीय मौसम विभागाच्या नागपूर प्रादेशिक हवामान विभाग केंद्राने नवस्वराजला ही माहिती दिली. भारताच्या एका बाजूला अरबी समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला बंगालचा उपसागर आहे. या दोन्ही समुद्रांमध्ये सध्या सातत्याने हवामानाचा बदल होत आहे. नागपूर प्रादेशिक मौसम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका समुद्रात उष्ण वारे तयार होत आहेत. तर दुसऱ्या समुद्रातील वारे अद्यापही थंडच आहेत. उष्ण आणि थंड वाऱ्यांची सरमिसळ होत असल्यामुळे पाऊस आणि गारपिटीचा सातत्यक्रम सुरूच आहे.
यावर्षी राजस्थानातून पाहिजे त्या प्रमाणात उष्ण वाऱ्यांचे वादळ अद्यापही तयार झालेले नाही. त्यामुळे एप्रिल महिना उलटून गेल्यानंतर पारा जेमतेम चाळीशीपर्यंत येऊन ठेपला आहे. जोपर्यंत कच्छ आणि राजस्थानच्या वाळवंटातील उष्ण वादळ पूर्णपणे सक्रिय होत नाही तोपर्यंत उन्हाळ्याची दाहकता खऱ्या अर्थाने जाणवणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारताच्या दोन्ही बाजूला असलेल्या या समुद्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या उलथा पालथीचा फटका विदर्भ, महाराष्ट्राला सर्वात मोठ्या प्रमाणात बसला आहे. पावसाळी ढग सातत्याने विदर्भावर घोंगावत असल्यामुळे राहून राहून पाऊस व गारपीट विदर्भाला झोडपत आहे.
सुरुवातीला १६ एप्रिल २०२३ पर्यंत हा क्रम चालेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु दोन्ही समुद्रातील उलथापालथी आणि चक्रीवादळ सक्रिय असल्यामुळे गुरुवार २० एप्रिल रोजी पुन्हा नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात पाऊस व गारपीट झाली. जोपर्यंत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हे वादळ शांत होत नाही तोपर्यंत, पाऊस व गारपिटीचा तडाखा कायम राहणार आहे असे अधिकाऱ्यांनी नवस्वराजला सांगितले.