Home » अमरावती विभागातून डॉ. रणजित पाटील यांच्यासह २३ जण मैदानात

अमरावती विभागातून डॉ. रणजित पाटील यांच्यासह २३ जण मैदानात

by नवस्वराज
0 comment

अमरावती : विधान परिषदेच्‍या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघात भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील, कॉंग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्‍यासह २३ उमेदवारांचे भवितव्‍य येत्‍या ३० जानेवारीला ठरणार आहे.

या निवडणुकीसाठी एकूण ३४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्‍यानंतर रिंगणात ३३ उमेदवार शिल्लक होते. यापैकी १० जणांनी आपले अर्ज सोमवार, १६ जानेवारी २०२३ रोजी मागे घेतले. या निवडणुकीत भाजप विरूद्ध कॉंग्रेस अशा थेट लढतीचे चित्र असेल. ईतर उमेदवार मात्र काही मतांचा फटका देऊ शकतात. अशात विविध संघटनांचे पाठबळ मिळवण्‍यासाठी उमेदवारांनी प्रयत्‍न चालवले आहेत. धीरज लिंगाडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. ते शिवसेनेच्‍या ठाकरे गटाचे माजी जिल्‍हा प्रमुख होते.

अमरावतीमध्ये वर्चस्व असलेल्या नागपूर युनिर्व्हसिटी टीसर्च असोसिएशनच्या (नुटा) भूमिकेकडे डॉ. पाटील आणि लिंगाडे यांचे यश-अपयश अवलंबुन आहे. सुमारे १२ बारा वर्षांपुर्वी झालेल्‍या निवडणुकीत ‘नुटा’चे तत्‍कालीन अध्‍यक्ष प्रा. बी.टी. देशमुख यांना पराभव पत्‍करावा लागला होता. त्यामुळे ‘नुटा’ क्षीण झाल्याचे बोलले जात होते. परंतु अलीकडेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या निवडणुकीमध्ये ‘नुटा’ने पुन्हा वर्चस्व मिळविले आहे. प्रहार आणि मेस्‍टाचे उमेदवार किरण चौधरी यांनी माघार घेतली असल्‍याने डॉ. पाटील यांना थोडा दिलासा मिळाला आहे. डॉ. रणजित पाटील यांना शिवसेनेच्‍या शिंदे गटासह इतर सहकारी पक्षांचा पाठिंबा आहे. परंतु तरीही त्यांच्यापुढे विजयाचे आव्हान आहे. भाजपचे बंडखोर शरद झांबरे यांची अपक्ष उमेदवारी कायम असल्याने त्यांना चिंता आहे.

 

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!