कोलकाता : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी गुरुवार, 17 नोव्हेंबर रोजी उत्तर बंगालमधील सिलीगुडी येथे मंचावर अचानक आजारी पडले. शहराच्या उत्तरेकडील टोकाला असलेल्या चौपदरी रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यासाठी गडकरी एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी त्यांना भोवळ आली.
कार्यक्रमाच्या मध्यभागी केंद्रीय मंत्र्यांनी अस्वस्थतेची तक्रार केली. काही वेळातच डॉक्टरांना बोलाविण्यात आले. डॉक्टरांनी तात्काळ येऊन तपासणी केली. “गडकरी यांच्या रक्तातील साखरेच्या पॅरामीटरमध्ये अचानक घट झाल्यामुळे केंद्रीय मंत्री यांना भोवळ आली. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले”, असे एका भाजप नेत्याने सांगितले. सिलीगुडीच्या डागापूर मैदानावर एका कार्यक्रमात गडकरी स्टेजवरच आजारी पडले. स्टेजवर असताना त्याची ‘शुगर लेव्हल’ कमी झाली आणि त्यांना लगेच मंचावरून खाली आणण्यात आले. त्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिस आयुक्तांना परिस्थितीकडे लक्ष देण्यास सांगितले. गडकरी यांना कार्यक्रमस्थळावरून बाहेर भाजप नेते राजू बिश्त यांच्या निवासस्थानी नेण्यात आले आहे. तेथे त्यांना विश्रांतीसाठी ठेवण्यात आले आहे.