जालना : शहरातील महावितरण कंपनीच्या कन्हैय्यानगर येथील कार्यालयात कार्यरत प्रकाश चव्हाण या अभियंत्याची रत्नागिरी येथे बदली झाली होती. हि बदली रद्द होऊन पुन्हा पुर्वीच्या जागी पदस्थापना झाली. त्यांचेसह २०- २५ मित्रांनी बदली रद्द झाल्याचा आनंदोत्सव साजरा केला, जो त्यांना महागात पडला.
२१ ऑगस्ट सोमवारी सकाळी कन्हैय्यानगरच्या चौफुली परिसरात मंडप घातला, चव्हाण यांच्या मित्रांनी त्यांना फेटा बांधून हार घालून खांद्यावर घेत मिरवणूक काढली, यावेळी फटाक्यांची आतिशबाजी करून डिजेच्या तालावर नाच केला. त्यामुळे शहरात काही काळ वहातूकीचा खोळंबा झाला.
जालना जिल्ह्यात पूर्वपरवानगी शिवाय डिजे लावण्यावर बंदी आहे. चव्हाण आणि त्यांच्या मित्रमंडळींनी साजरा केलेला जल्लोष त्यांच्या अंगलट आला. नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी चव्हाण व इतर ३० जणांवर सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.