अमरावती : मेळघाटात गेल्या तीन वर्षांपासून एसटी बसच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील आदिवासींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
कोरोना काळात बंद झालेल्या बस फेऱ्यांपैकी मेळघाटात अनेक गोष्टीला सुरूच करण्यात आले नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचाही या भागाला मोठा फटका बसला. नागपूर आणि अमरावती येथून मध्य प्रदेशातील इंदोर बऱ्हाणपूर या शहरांना जोडणारा मार्ग मेळघाटातून जातो. नागपूर वरून इंदोरला जाणारी एकमेव बस फेरी ही नियमित आहे. धारणी हे तालुक्याचे ठिकाण असून देखील या ठिकाणी आगार नसल्यामुळे रस्त्यात एखादी गाडी बंद पडली, तर प्रवाशांच्या मदतीसाठी राज्य परिवहन महामंडळाची कुठलीही सुविधा या भागात नाही.
धारणीपासून महाराष्ट्रातील किंवा मध्य प्रदेशातील कुठलेही बस आगार हे 100 किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर आहेत. या भागात मोबाईल फोनची रेंज नसल्यामुळे अडचणीत असलेले बस चालक किंवा प्रवाशांचा कुणाशीही संपर्क होऊ शकत नाही. कोरोनापूर्वी मेळघाटातील अनेक दुर्गम गावात गाड्या धावत होत्या. यामध्ये प्रामुख्याने दादरा, तारूबांधा, भवर, पटिया, जाडीदा आधी अनेक गावांचा समावेश होता. आता या सर्व बस फेऱ्या बंद करण्यात आले आहेत. बस फेऱ्याच उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्यांना चक्क जंगलातून पायी चालत शाळा महाविद्यालय गाठावी लागत आहेत.
डोंगरावर असणाऱ्या गोलाई या गावातून पूर्वी अकोला जिल्ह्यातील अकोट शहरापर्यंत एसटी बस धावत होती. या बसमुळे लगतच्या धुळघाट, राणीगाव या भागातील रहिवाशांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणारा किराणामाल तसेच इतर साहित्य अकोट येथून आणण्यास ही बस फेरी अतिशय सुविधेची होती. आता या मार्गावरून फक्त खासगी बसेस धावतात. राज्य परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या कमी झाल्याकडे या भागातील लोकप्रतिनिधींची लक्ष नाही. त्याचा फटका आदिवासींना बसत आहे.