गडचिरोली : तेलंगणा सरकारकडून महाराष्ट्र सीमेवर उभारलेल्या वादग्रस्त मेडीगड्डा धरणाच्या पुलाचा पाया खचल्याने गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. मार्गावरील रहदारीदेखील रात्रीपासून बंद करण्यात आली आहे.
नागरिकांच्या प्रचंड विरोधानंतरही महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवरील गोदावरी नदीवर मेडीगड्डा धरण उभारण्यात आले. दरवर्षी या धरणातील पाण्यामुळे शेकडो एकर शेतीचे नुकसान होते. दरम्यान, २१ ऑक्टोबरला रात्री उशिरा अचानक मेडीगड्डा धरणावरील महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांना जोडणारा गोदावरी नदीवरील पुलाचे २०, २१ व २२ क्रमांकाचे खांब खचले. त्यामुळे सायरनद्वारे सूचना देऊन दोन्ही बाजूंनी रस्ता वाहतुकीसाठी तातडीने बंद केला. त्यानंतर धरणाचे काही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
अचानक पाणी सोडल्याने आसरअल्ली, सोमनूर संगम, टेकडामोटला अशा १५ ते २० गावांतील शेतकऱ्यांना याचा फटका बसला. नदीकाठी सिचंनासाठी विद्युतपंप, पाईप, वायर या पाण्यात वाहून गेले. मिरची, कापूस उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले आहे. मेडीगड्डा प्रकल्प सिरोंचा तालुक्यातील लोकांसाठी नुकसानकारक आहे. बॅकवॉटरमुळे दरवर्षी शेतीचे नुकसान होते.