बुलडाणा : शिवसेना आणि एकनाथ शिंदे प्रणित शिवसेना बाळासाहेब या दोघांच्या वादाचे पर्यावसान बुलडाण्यात तुफान धक्काबुक्की व फेकाफेकीत झाले. या घटनेनंतर बुलडाण्यातील बातार समितीत तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बाजार समितीत सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा केल्याचा आरोप होत आहे. शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले व त्यांच्या गटाला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्य केल्याचा हा आरोप आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली.
पोलिसांसमोरच हा सर्व प्रकार झाला. खेडेकर यांनी हल्ला करणाऱ्यांत आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते, असा आरोप केला. यासंदर्भात अनेक मोबाईल व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. बराच वेळपर्यंत सुरू असलेल्या या धिंगाण्यात पोलिसांनी मात्र मध्यस्थी केली नाही. खुर्च्यांची मोठ्या प्रमाणावर फेकाफेक करण्यात आली . एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. घटनेनंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाल्यामुळे सर्वांनीच पळ काढला.