अकोला : महाराष्ट्रातील विधान परिषदेतील पाचही जागा भारतीय जनता पार्टी, शिवसेना बाळासाहेब ठाकरे व युती प्रचंड बहुमताने जिंकेल, असा ठाम विश्वास भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातील भाजपा-शिवसेना बाळासाहेब ठाकरे युतीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या प्रचारार्थ अकोल्यात आयोजित पदाधिकारी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, पदवीधर निवडणूक प्रमुख माजी आमदार चैनसुख संचेती, उपाध्यक्ष आमदार डॉ. संजय कुटे, प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल आमदार आकाश फुंडकर, आमदार डॉ. रणजित पाटील, अकोल्याचे माजी महापौर विजय अग्रवाल, तेजराव थोरात, किशोर पाटील, अनुप धोत्रे, माजी आमदार बळीराम सिरस्कार आदी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी अमरावती पदवीधर मतदार संघात ‘रेकॉर्ड ब्रेक’ मताने विजय होईल तर कार्यकर्त्यांच्या बळावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर विश्वास व्यक्त करीत आगामी नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीतही भाजप व शिवसेना बाळासाहेब ठाकरे युवतीला विजय मिळेल, असे बावनकुळे म्हणाले. भाजपमध्ये कोणताच गटतट नाही. केवळ कमळ हा एकच गट आहे. विरोधक कितीही प्रचार करीत असले, वेगवेगळ्या माध्यमातून अपप्रचार करीत असले तरी मतपेटीतून भारतीय जनता पार्टीवर मतदारांचा विश्वास हेच सिद्ध करण्यात पुरेसा आहे.
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता सजग प्रहरी आहे, असे मत चैनसुख संचेती यांनी व्यक्त केले. भाजपा कार्यकर्ता हा सन्मानाने काम करणारा कार्यकर्ता असल्याचे आमदार सावरकर म्हणाले. भाजप महानगर व जिल्ह्याच्या संदर्भात विजय अग्रवाल व माधव मानकर यांनी माहिती दिली. अकोला तालुका भाजपा अध्यक्ष अंबादास उमाळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अॅड. देवाशिष काकड यांनी केले.