अकोला : अमोल मिटकरी यांनी आपला इतिहास तपासण्याची गरज आहे. केवळ द्वेषबुद्धीने व प्रसिद्धीसाठी आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार संजय धोत्रे यांच्यावर टीका केली. त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर लावलेल्या आरोपाचे उत्तर द्यावे. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार मिटकरींना संसदीय कामकाजाचा किती अभ्यास आहे हे देखील कळले, असा टोला भाजप सचिव विजयसिंह सोळंके यांनी लगावला. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.
मिटकरी यांनी ट्विट करत अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांच्यावर निशाणा साधला. याचे वृत्त ‘लोकसत्ता’मधून प्रसारित होताच अकोला भाजपने आमदार अमोल मिटकरींवर पलटवार केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत जात अमोल मिटकरी सत्तेत सहभागी झाले आहेत. तरीदेखील त्यांनी भाजप खासदारांवर टीका केली. त्यावरून आता अकोल्यात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद सुरू झाला आहे. मिटकरींवर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप लावलेले आहेत. त्यावर आमदार मिटकरी उत्तर देत नाहीत. अमोल मिटकरी यांनी त्याबद्दल बोलावे व नंतर इतर पक्षाच्या नेत्यांवर टीका करावी, असे विजयसिंह सोळंके म्हणाले. खासदार संजय धोत्रे अकोला लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा विजयी झाले आहेत.
सातत्याने लोकसभेत सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. गेल्या दीड वर्षांपासून ते आजारी आहेत. त्याआधी केंद्रीय राज्यमंत्री होते. मंत्री म्हणून त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नव्हता, याचे साधे ज्ञान व संसदीय माहिती अमोल मिटकरींना नाही. यावरून त्यांचा लोकप्रतिनिधी नात्याने किती अभ्यास आहे, याचा प्रत्यय येतो, असा टोला विजयसिंह सोळंके यांनी लगावला. जनतेचा खासदार संजय धोत्रे यांच्यावर विश्वास आहे. या मतदारसंघातून भाजपला सात वेळा लोकसभेमध्ये विजयी करण्याचे कार्य जनतेने केले. जनतेचा अपमान करण्याचा अधिकार आमदार अमोल मिटकरी यांना नाही. त्यांनी मर्यादेमध्ये राहून वक्तव्य करावे,अन्यथा भाजप त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देईल, असा इशारा देखील सोळंके यांनी दिला.