शेगाव (जि. बुलडाणा) : भारतीय जनता पार्टी देशामध्ये केवळ दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. त्यामुळे देशातील शेतकरी, तरुण, महिला आणि विविध जाती धर्माचे लोक घाबरले आहेत. ही भीती दूर करण्यासाठीच भारत जोडो यात्रा सुरू करण्यात आल्याचे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या विदर्भातून प्रवास करत आहे. शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 रोजी ही यात्रा शेगावात पोहोचली. शेगावचे संत श्री गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी शेगावात जाहीर सभेला संबोधित केले. आपल्या 20 मिनिटांच्या भाषणात राहुल गांधी म्हणाले, केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता असताना विदर्भातील शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्यात आले होते. मात्र सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली. देशभरातील शेतकरी त्यांच्या कृषिमालाला भाव नसल्याची तक्रार करत आहे. उच्चशिक्षित तरुण मजुरी करीत आहेत किंवा टॅक्सी चालवित आहेत. सध्या भाजप केवळ द्वेषाचे राजकारण करत आहे. याऐवजी त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकांशी संवाद साधल्यास चित्र वेगळेच असेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी चालत असलेल्या रस्त्यांवरून मार्गक्रमण केल्यास त्यांना सामान्यांची दुःख काय आहेत, ते कळेल.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे झालेल्या अनेक संतांनी जातीद्वेष, भेदभाव नष्ट केला. याच संतांच्या पावलावर पाऊल ठेवत भारत जोडो यात्रा आपले काम सुरू ठेवेल, असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा आवाज होते. राजमाता जिजाऊ यांनी त्यांना घडविले. त्याच राजमाता जिजाऊंच्या पावनभूमीत पोहोचल्याने आपल्याला आनंद झाला, असे देखील राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते पदाधिकारी उपस्थित होते.
संतचरणी नमस्कार
शेगाव येथे पोहोचल्यानंतर खासदार राहुल गांधी यांनी संत श्री गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या समाधीचे व गादीचे दर्शन घेतले. त्यानंतर महाप्रसाद बारी येथे जाऊन महाप्रसाद ग्रहण केला.
मनसे कार्यकर्त्यांना पकडले
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर खासदार राहुल गांधी यांनी टीका केल्याने राहुल यांची सभा उधळून लावा, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले होते. राज यांच्या आदेशानुसार राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते व भाजपचे कार्यकर्ते शेगाव कडे निघाले होते. पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शेगावची व सभास्थळाची चारही बाजूंनी कळत नाकाबंदी केली होती. शेगावकडे येणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे सोडण्यात आले. आसपासच्या जिल्ह्यातून भाजपचे कार्यकर्ते ही शेगावात दाखल झाले होते. त्यांनाही पोलिसांनी वेळीच रोखले.