नागपूर : मैत्री परिवार संस्थेच्या देवनगर येथील विद्यार्थी उन्नतीगृहामध्ये बँक ऑफ बडोदाचा 115 वर्धापन दिन साजरा करण्यात आला. बँक ऑफ बडोदाच्या वर्धमान नगर शाखेचे व्यवस्थापक सौरभ सुमन यांनी सीएसआर निधीतून 60 हजार रुपयांचा धनादेश मैत्री परिवारचे सचिव प्रा. प्रमोद पेंडके यांना प्रदान केला.
विद्यार्थी उन्नतीगृहामध्ये ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील 45 विद्यार्थी वास्तव्यास असून त्यांचा मानसिक, शारीरिक, बौद्धीक व शैक्षणिक विकास साधण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात.
मैत्री परिवार अतिशय उत्कृष्ट कार्य करीत आहे. समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे सुरू असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. 115 वर्ष जुन्या बँक ऑफ बडोदाने नेहमीच समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावला असून क्षेत्रीय व्यवस्थापक घनश्याम गुप्ता, उपक्षेत्रीय व्यवस्थापक अनिशकुमार यांच्या प्रेरणेतून उन्नतीगृहाला हा मदतनिधी देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाची सुरुवात मुलांनी सादर केलेल्या ‘तु बुद्धी दे’ या प्रार्थनेने झाली. प्रा. अनिल यावलकर, प्रा. माधुरी यावलकर, दिलीप ठाकरे, सीए समीर व स्वरूप वझलवार, मंजुषा जोशी, बंडू भगत यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. माधुरी यावलकर यांनी केले. प्रा. प्रमोद पेंडके यांनी आभार मानले.