अकोला : केंद्र आणि राज्य शासना प्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा अशी बॅंक कर्मचाऱ्यांची मागणी आहे. अनेक राष्ट्रीयकृत बॅंकमधे ग्राहकांना योग्य, तत्पर सेवा तसेच सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची ग्राहकांची तक्रार आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या कामकाजाबाबत जास्त नाराजी आहे. ऑनलाईन आर्थिक व्यवहार तसेच नेटबॅंकींगमुळे कर्मचारी, अधिकारी यांचा कामाचा भार काही अंशी कमी झाला आहे. परंतु सेवांचा दर्जा खालावला आहे. बॅंकला ग्राहकांची आवश्यकता नसून, ग्राहकांना बॅंकची गरज आहे, अशा थाटात काही कर्मचारी, अधिकारी वागतात.
दुसरा आणि चौथा शनिवार बॅंकला सुटी असते, आता कर्मचारी, अधिकारी पहीला तसेच तिसऱ्या शनिवारी सुटीची मागणी करत आहेत. यामागणी संबंधात इंडियन बँकिंग असोसिएशन (आयबीए) आणि युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनची २८ जुलै रोजी बैठक होईल, यात या मुद्द्यावर विस्ताराने चर्चा करण्यात येईल. यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालय व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी असणे आवश्यक आहे. त्याअनुशंगाने दबाव निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या बैठकीचे आयोजन केले आहे.
संघटनांच्या पाच दिवसाच्या आठवड्याची मागणी मान्य झाल्यास बॅंकांना दरमहीन्याला किमान नऊ ते दहा दिवस सुट्टी राहील. परंतू दैनंदिन कामकाजात ४० मिनिटांची वाढ होईल.
भरपूर पगार आणि सोई सुविधा असणारे बॅंक कर्मचारी व अधिकारी यांना पाच दिवसाच्या आठवड्याचा लाभ मिळावा, परंतु सेवांचा दर्जा देखील वाढावा, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे.