Akola | अकोला : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव राजंदा येथील श्री गुरूदेव सेवा मंडळ दरवर्षी विविध कार्यक्रम घेऊन साजरा करते. यावर्षी 7 ते 10 डिसेंबर पर्यंत महोत्सव साजरा होत आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अकोलाच्या पदाधिकाऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी राजंदा येथील कार्यक्रमात प्रबोधन केले. (Awakening By Office Bearers Of Akhil Bharatiya Grahak Panchayat In The Program Of Shri Gurdeo Mandal At Rajanda Of Akola)
मंचावर गुरूदेव मंडळाचे वसंत केदार, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संघटनमंत्री हेमंत जकाते, अध्यक्ष दिनेश पांडे, गॅस व पेट्रोल ग्राहक संघप्रमुख शरद यादवाडकर, बॅंक विमा संघ प्रमुख सुनिल बाळापूरे होते. राष्ट्रसंतांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
दिनेश पांडे यांनी ग्राहक पंचायतच्या स्थापनेपासूनची माहिती विस्ताराने दिली. 2023- 2024 हे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार असून कार्यशाळा, अभ्यास वर्ग, ग्राहक मेळावे घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थिताना ऑनलाईन सदस्य होण्याचे तसेच राजंदा येथे नव्याने ग्राम ग्राहक संघ स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी केले. शासनाने गरिबांसाठी सुरू केलेली उज्ज्वला गॅस योजना तसेच गॅस सिलिंडर वितरण प्रणालीत झालेली सुधारणा अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या प्रयत्नांचे फलित असल्याचे शरद यादवाडकर यांनी सांगितले. पेट्रोल पंपावार ग्राहकांना विनामूल्य हवा, पिण्यासाठी पाणी तसेच प्रसाधनगृहाची व्यवस्था योग्य ठेवण्याबाबत संचालकांना वेळोवेळी अवगत करण्यात येते, असेही ते म्हणाले. बॅंकांचे सेवातील त्रुटी तसेच विम्याच्या दाव्याची रक्कम मिळण्यासाठी अनेकांना त्रास होत होता बॅंक विमा संघाच्या पाठपुराव्यामुळे बॅंकांचे सेवेत सुधारणा झाली व दाव्यांची प्रलंबित प्रकरणे मार्गी लागल्याचे सुनील बाळापूरे यांनी सांगितले. हेमंत जकाते यांनी उपस्थिताशी संवाद साधून वस्तू खरेदी करताना घ्यावयाची दक्षता याबाबतची माहिती दिली. वाॅरंटी, गॅरंटी यातील फरक, आयएसआय, एगमार्क, एफएसएसएआय, खाद्यपदार्थांच्या वेष्टणावरील शाकाहारी, मांसाहारीचे चिन्ह, घरगुती गॅस सिलिंडरचे वजन आदी बाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वसंत केदार यांनी केले. कार्यक्रमाला श्री गुरूदेव सेवामंडळाचे पदाधिकारी सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर, मिलिंद गायकवाड व देवानंद गहीले यांनी कळवले आहे.