Home » Attempted self-immolation : रस्त्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न

Attempted self-immolation : रस्त्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न

PWD Office : अकोल्यात आठवडाभरापासून सुरू होते आमरण उपोष

by नवस्वराज
0 comment

Akola : रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच मंगेश काळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला.

अकोला महानगरातील तुकाराम चौक ते मलकापूर-येवता या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे, या मागणीसाठी आठवडाभरापासून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे मित्रमंडळ आणि ‘निर्भय बनो’ जन आंदोलनाच्या अंतर्गत बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. उपोषणादरम्यान मंगेश काळे आणि मित्र मंडळाच्यावतीने दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे.

रस्त्याच्या मागणीसह पाइपलाइन दुरुस्ती व पथदिव्यांचे काम तत्काळ पूर्ण व्हावे अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा आयुक्त, जिल्हा प्रशासन लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत नव्हते. त्यामुळे 4 फेब्रुवारी रोजी मलकापूरमध्ये बंदही पाळण्यात आला. परंतु मागणी पूर्ण न झाल्याने 5 फेब्रुवारी रोजी शिवसैनिकांसह आमदार नितीन देशमुख, माजी आमदार संजय कराळे, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, माजी नगरसेवक राजेश मिश्रा, राहुल कराळे, मंगेश काळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेले. यावेळी मंगश काळे यांनी अचानकपणे सोबत आणलेली डिझेलची बाटली अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. आमदार नितीन देशमुख यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानमुळे मोठा अनर्थ टळला. काळे यांच्या हातातील आगपेटी आमदार देशमुखांनी हिसकावून घेतली.

रस्ता ताबडतोब व्हावा म्हणून शासन, प्रशासन व जनप्रतिनिधींना पाचवेळा निवेदन दिले. तसेच अनेकवेळा आंदोलने केली. परंतु शासनाने फक्त आश्वासन देऊन आंदोलने संपवली. परंतु तुकाराम चौक ते मलकापूर या अर्धा किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे असा पवित्रा घ्यावा लागला असे मंगेश काळे यांनी सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!