Home » तक्रार निवारण न होताच ग्राहकांना येतात तक्रार निवारण झाल्याचे संदेश : महावितरणचा अफलातून कारभार

तक्रार निवारण न होताच ग्राहकांना येतात तक्रार निवारण झाल्याचे संदेश : महावितरणचा अफलातून कारभार

by नवस्वराज
0 comment

अकोला : विजेच्या तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने प्रामाणित संचालन प्रक्रिया (Standard operating procedure) नुसार महावितरण कंपनीला ठराविक कालावधीत वीज ग्राहकांना सेवा पुरवीण्याचे निर्देश दिले आहेत. यात कसूर केल्यास कंपनीला प्रतितास किंवा प्रतिदिवसा प्रमाणे ग्राहकास भरपाई द्यावी लागते. एकाधिकारशाहीमुळे कंपनीतर्फे प्रामाणित संचालन प्रक्रिया ( Standard operating procedure ) कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

महावितरणने कुठलीही पूर्वसूचना न देता शहरातील अनेक ग्राहकांचे तक्रार निवारण केंद्र बदलले आहेत. महतप्रयासाने तक्रार निवारण केंद्राची माहिती मिळाली आणि तक्रार नोंदवण्यासाठी केंद्रात फोन केला, आणि नशिबाने फोन उचलला तर ग्राहकाने ऑनलाईन तक्रार करावी असे सांगितले जाते. ग्राहकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो.

अकोला शहर विभागातील एका वीज ग्राहकाने २९ जुलै रोजी ऑनलाईन तक्रार नोंदवली त्याचा क्रमांक २८९०६५६८ आहे, तक्रारीवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. ग्राहकाला ३० जुलै सकाळी १०.३५ वाजता तक्रारीचे निराकरण करण्यात आले असल्याचा संदेश प्राप्त झाला. ग्राहकाने महावितरणच्या कस्टमर केअरला फोन करून तेथील कर्मचार्याला तक्रारीच्या स्थितीची माहिती दिली असता नव्याने तक्रार नोंदवण्यात आली. ग्राहकांच्या काही तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विलंब होणार असल्यास तशी सूचना ग्राहकांना देण्यात यावी. महावितरणकडुन होत असलेल्या विलंबामुळे खासगी वायरमन तक्रारी सोडविण्यासाठी ग्राहकांकडुन अव्वाच्या सव्वा पैसे वसुल करून आर्थिक शोषण करीत आहेत.

अधिकारी ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण झाले किंवा नाही याची शहानिशा करत नसल्याचे दिसते. महानगरात शहर विभाग, मंडळ तसेच परिमंडळ कार्यालय असतांना शहरातील वीज ग्राहकांचे हे हाल आहेत; तर ग्रामीण भागातील ग्राहकांच्या परिस्थितीची कल्पना करवत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या समस्यांचे तत्परतेने निराकरण होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!